एअरसेल आणि तिच्या उपकंपनीकडून १७ हजार ५०० टेलिकॉम टॉवरची खरेदी करून जीटीएल कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जगातील सर्वांत मोठी टॉवर कंपनी बनली आहे. ८४०० कोटी रुपयांना हा सौदा झाला.

२३ टेलिकॉम सर्कल्समधील ३२ हजार ५०० टॉवर जीटीएलच्या मालकीचे झाले आहेत. या शिवाय एअरसेल कंपनी तीन वर्षांच्या आत आणखी २० हजार टॉवर जीटीएलकडे सुपूर्द करणार आहे. त्यामुळे ५० हजारांहून अधिक टॉवर मालकीची असणारी जीटीएल ही जगातील एकमेव कंपनी असेल.

जीटीएल इन्फ्राचे अध्यक्ष मनोज तिरोडकर यांनी यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर सांगितले की, एअरसेलचे टॉवर आमच्याकडे आल्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यात आमची कंपनी अग्रेसर बनली आहे. आमच्या टॉवरमुळे मोबाइल सैवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या भांडवलात व खर्चात कपात होईल आणि त्यांना ग्राहकांना कार्यक्षम सेवा पुरविणे शक्य होईल.

एअरसेल लि.च्या अध्यक्षा सुनीता रेडी यांनी, सदर करारामुळे जीटीएलशी आमची भागीदारी अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला. जीएसएम मोबाइल सेवा पुरविण्यात एअरसेल कंपनी देशात पाचव्या क्रमांकावर आहे. सुमारे ३ कोटी १० लाख ग्राहक असून संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लि.ने एअरसेल टेलिकॉमकडून टॉवर असेट खरेदीचा करार नुकताच केला. जीटीएलचे अध्यक्ष मनोज तिरोडकर आणि एअरसेलच्या अध्यक्षा सुनीता रेड्डी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Source : GTL Infra

जीटीएल बनली सर्वात मोठी टॉवर कंपनी!