उद्योग जगतात मराठीचा ‘टॉवर’

मनोज तिरोडकर यांच्या जीटीएलने एअरसेलचे १७ हजार ५०० टॉवर खरेदी केले

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) – किर्लोस्कर, गरवारे यासारख्या नावांनंतर उद्योग क्षेत्रात निर्माण झालेली मराठीची पोकळी मऱ्हाटमोळे उद्योजक मनोज तिरोडकर यांनी भरून काढली आहे. तिरोडकर यांच्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरने आठ हजार ४०० कोटी मोजून एअरसेल या आघाडीच्या मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीचे तब्बल १७ हजार ५०० टॉवर खरेदी करण्याचा करार केला. या व्यवहारामुळे जीटीएल ही जगातील सर्वात मोठी टॉवर कंपनी झाली आहे. मनोज तिरोडकर यांनी यानिमित्ताने नवी भरारीच घेतली असून उद्योग जगतात मराठी यशाचा गगनभेदी ‘टॉवर’च उभारला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशीच मनोज तिरोडकरांनी घेतलेल्या या गोड निर्णयामुळे मराठी मन आनंदून गेले आहे.

आम्ही दोन ते चार टॉवरपासून सुरुवात केली होती. इतक्या कमी वेळात हा पल्ला गाठू असे वाटले नव्हते. या व्यवहारामुळे टेलिकॉम क्षेत्रात आमचा दबदबा निश्चितच वाढेल.

– मनोज तिरोडकर, अध्यक्ष, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर

कोटीच्या कोटी उड्डाणे

॥ नव्या टॉवर्समुळे पुढील १५ वर्षे प्रतिवर्षी ७०० कोटींचे उत्पन्न

॥ अतिरिक्त २० हजार टॉवर्समधूनही प्रतिवर्षी ७०० कोटी मिळणार

॥ देशभरातील २३ टेलिकॉम सर्कलमध्ये विस्तार

॥ शहरी भागात टूजी/थ्रीजी ऑपरेटर्स ग्राहक म्हणून मिळणार

Source : GTL Infra